Saturday, June 20, 2015

तिची डिलिवरी झाली तेव्हा….

नुकतीच रमाची  डिलिवरी झाली होती, पहिल्यांदाच ती आई झाली होती. आईपणा म्हणजे काय हे तिला माहीतच नव्हते. या आधी असच काही, सून वं बायको पण तिच्या साठी नवीन होते.  पण प्रत्येक नवीन नातं शिकून, चुका करून ती सांभाळून घेत होती. महाराष्ट्रात पहिली डिलिवरी माहेरी असते, त्याप्रमाणे ती पण माहेरीच होती. हल्ली नॉर्मल डिलिवरी म्हणजे चमत्कार झालाय, पण तिच्याबापतीत तो घडला होता. मुल झाले तसे सगळे तिला भेटायला येत होते. त्यात अनेक अनुभवी बायका पण होत्या. आई झाल्यावर रात्र अपरात्र जागून बाळाची काळजी तर स्त्रीला घ्यावीच लागते, पण त्याहूनही जास्त तिला सासरच्यांचे वं  अनुभवी स्त्रियांचे अचानक अनपेक्षित असंख्य सल्ले आणि आपण आई म्हणून कसे चुकतोय याची जाणीव करून देणे, याला सामोरं जावे लागेल हे तिला नुकतेच कळले होते. नवरा आर्मीमध्ये वं बॉर्डर वर लांब असल्यामुळे, तिची विवंचना व आनंद ती केवळ तिच्या आईशीच बोलू शकत होती. 



रात्री तिची आई जेवणाचा डबा  घेऊन  इस्पितळात आली होती, तेव्हा ती आईला म्हणाली, " आई, मला निसर्गाने जन्मताच आई बनवले होते ना?" 
तिची आई हसत म्हणाली ," हो. लहानपणी तू तासंतास भातुकली खेळत बसायची, तेव्हा आपल्या बाहुलीची खूप काळजी घ्यायची. तिला खऱ्या बाळासारखी  जपायची." थोडा वेळ थांबत  ती म्हणाली, " पण तू असे का विचारतेस?"

आपल्या बाळाला जवळ घेत रमा म्हणाली, " दोन दिवस झाले मला इस्पितळात, माहेरचे नातेवाईक, माझ्या सासरचे नातेवाईक, अनेक स्त्रिया पाहायला  येउन गेल्या .पण  त्यांच्या कडून मला असे  सल्ले ऐकावे लागतील असे वाटले नव्हते, ' अगं  बाळाला नीट धर, त्याची मान सांभाळ' ,  ' बाळाला टोपी का नाही घातली?', 'गुटी द्यायला विसरू नको हा!!', 'बाळाची तब्येत मस्त झाली पाहिजे, चांगला खात जा', ' बाळाला मांडीत नको घेऊ हा जास्त.' , 'बाळाला जवळ घेऊन नको झोपू.' , वगैरे वगैरे. सासरचे हळूच म्हणतात ' आपल्या घरी कधी जायचं आपल्या बाळाला?' , आई हे मुल माझ्याच उदरी जन्माला आलय, तू पण म्हणतेस कि मी बाहुलीला जपायचे, मग या खऱ्या-खुऱ्या  बाळाला मी जपणार नाही असे का वाटते सगळ्यांना? अजून दोनच दिवस झालेत मला बाळ  होऊन, पण मी लगेच कशी एका अनुभवी आई सारखी वागू?  असे का वागतात सगळे? अनुभवातूनच माणूस शिकतो हे सगळ्या स्त्रियांना का कळत नाही." रमा आईकडे पाहत पुढे म्हणाली ," निसर्गानेच  स्त्रीला ही  शक्ती दिलीये आणि ती शक्ती वापरण्याची कलाही तिच्या अंगी उपजतच असते. जाऊदे तू हसत बघतेस, खरच आईला सुरुवातीपासूनच किती ऐकावे लागते हे आता कळतंय. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असे नुसते म्हणतात, शारीरिक रित्या ती थकलेली असतेच, परंतु तिच्या  मनाचे काय?  आपण स्त्रिया अनुभवाने शहाण्या होतो, पण दुसऱ्याला शहाणपणा दाखवणं का सोडत नाही? जसे आपण अनुभवातून शिकतो तसेच नवजात आया, सुना, पत्नी, सुद्धा शिकणार हे लक्ष्यात ठेवावे." अचानक रमाचे बाळ रडू लागले, त्याने शी केली होती, ती साफ करायला त्या दोघी, आई आणि आजी कामाला जुंपल्या.