Sunday, October 29, 2017

फराळाचा भुगा!!


टेबल पुसून झाल्यावर ६० वर्षांचे कृष्णराव बाजूच्या कपाटातल्या फाईल नीट ठेवत होते तेवढ्यात कॅबीनचा दरवाजा उघडला आणि रोहित साहेब, म्हणजेच रोहित जयवंत तावडे, आत आले. गेल्यावर्षी  त्यांच्या आई बाबांचे एका दुर्घटनेत अकस्मात निधन झाल्यामुळे त्यांना अमेरिका सोडून भारतात यावे लागले व आपल्या बापाने रचलेला २५ वर्षांचा व्यवसाय ३५ वर्षांच्या वयात पुढे चालवावा लागला.  ऑफिस मधली  हि त्यांची पहिलीच दिवाळी होती. आत येताच ते त्वरित खुर्चीवर बसले, आणि आपल्या टेबल वरच्या फोन वरून एक नंबर दाबला. "हॅलो...हा ढेरे साहेब...  हा सॉरी, अहो खरंच सॉरी मी  विसरलोच तुम्हाला फोने करायला, अहो तुमची दिवाळीतली  मिठाई आणि ग्रीटिंग पाहून माझी मुलगी खूप आनंदी झाली....  खूप खूप धन्यवाद! काही नाही आता मी निघतोय. मिटिंग ला बोलूया, शेवटी हा करोडोंचा कॉन्ट्रॅक्ट आहे, आम्ही गमावू शकतच नाहीत तुमच्या साऱ्या अटी मान्य आहेत आम्हाला. आजच फायनल करूया ,सौदा पक्का! ....  ओके साहेब भेटूया मिटिंग ला.....  बाय !" म्हणत त्यांनी फोन ठेऊन दिला.

बाजूला उभे असलेले  कृष्णराव रोहित साहेबांकडे पाहताच होते, " अरे कृष्णा जरा ती फा ०१ फाईल दे मला कपाटातून." साहेबांचे वाक्य ऐकून लगेच कृष्णराव फाईल शोधू लागले  पण ५ मिनिटे झाली तरी मिळेना. " काय कृष्णराव?  आता जमत नाही काम तुम्हाला... साठी ओलांडली, आराम करा घरी, एक फाईल शोधायला इतका वेळ लागतोय. माझी मिटिंग ची वेळ निघून जाईल जरा शोध या टेबल खाली असेल...हि घे चावी." म्हणत एका टेबलाकडे बोट दाखवले.  दिलेल्या चावीने उघडून कृष्णराव त्या टेबल खालच्या कपाटात फाईल  शोधू लागले, " माझे बाबा होते म्हणून चालायचे तुमचे.... आता कायद्याप्रमाणे रिटायर व्हायला हवे तुम्ही... मी अमेरिकेतून शिकून आलोय काम करून आलोय... भावना बाजूला ठेऊन काही निर्णय घ्यावे लागतात..."

कृष्णराव एक फाईल काढू लागला तेवढ्यात गचकन एक पिशवी खाली पडली... त्यात कृष्णरावने दिवाळी आधी दिलेला फराळ होता...  जमिनीवर सांडून त्याचा भुगा झाला , " अरे कृष्णा हे काय? अरे ती पिशवी खाली पाडलीस....  कचरा झाला सगळा.. साफ करून घे.... आता मी निघतोय मला मिटिंग आहे ..... " हे म्हणत फाईल घेऊन रोहित साहेब निघून गेले.

पण  ह्या घटनेने फराळाचा नाही तर एका मनाचा भुगा झाला होता...आपल्या नातीने बनवून दिलेले दिवाळी ग्रिटिंग सुद्धा अजून कपाटात पाकिटात बंद पडलेय या टेबलाखाली... हे पाहून मनाचा चुराडा झाला होता. जयवंत साहेब असते तर आज त्यांनी आपला फराळ "बेश्ट हाय !!" म्हणत दाद दिली असती... नातीला खोटे सांगावे नसते लागले " बाळ  तुझे ग्रीटिंग पाहुन साहेब खूप खुश झालेत!!" साहेबांनी तिला गेले काही वर्ष भेट म्हणून  दिलेली मोठी टॉफी आज मलाच न्यावी लागेल... आज पासून इथे परत यायचे नाही... तनाने नाही तर मानाने रिटायर होतोय मी जयवंत साहेब..... माफ करा मला!.. असे मनात म्हणत कृष्णराव अश्रुंचे घोट पित कॅबिन बाहेर निघून गेले.

कळत-नकळत आपल्या दैनंदिन जीवनात हे रोज घडते. कोणाची पाच रुपयांची सुद्धा भेट हि मनाला आनंद देणारी असली पहिले कारण त्या पाच रुपयात सुद्धा त्या व्यक्तीचा अनमोल वेळ व श्रम असतात आणि सर्वात महत्वाच्या भावना .... अश्या व्यक्तींना फक्त गरज असते आपल्या प्रतिसादाची... तेच द्यायचे राहून जाते.