पाच वर्षांपूर्वीची गोष्ट, पुण्याच्या एका खाजगी कंपनीत काम करताना पुण्याहून मुंबईला आपल्या घरी शिवनेरी मधून जात होते. माझ्या बाजूला एक विवाहित स्त्री होती, तिचे नाव लक्ष्मी. ती मूळची तमिळनाडू ची होती. आमच्या खूप गप्पा रंगल्या, तेव्हा कळले की ती पुण्याला आयबीएम या कंपनीत सॉफ्टवेर डेवेलपर होती.
मी तिला सहज विचारले, " मग मुंबई ला काय, ऑफीसच्या कामासाठी का?"
लक्ष्मीने थोडा वेळ थांबून मग उत्तर दिले " नाही, तिथे माझे मिस्टर असतात."
"ओके, मग ते तीथे आहेत का नोकरीला?" मी विचारले.
"हो, तिथेच असतात, ते रीलायन्स मध्ये प्रॉजेक्ट मॅनेजर आहेत. आणि मी पुण्याला." ती सांगू लागली. "मी त्यांना महिन्यातून एकदा भेटायला येते, कामातून वेळ काढून. नाहीतर मग ते येतात मला भेटायला पुण्याला. माझे माहेर तामीळनाडू मधे आहे आणि सासर आंध्रप्रदेश मध्ये. तामीळनाडूला नमक्कल नावाचा एक जिल्ला आहे तेथे आमचे गाव आहे. तिथे मला दर पंधरा दिवसांनी जावे लागते, माझ्या मुलीला भेटायला, ती २ वर्षांची आहे.तिला मी माझ्या आईकडे ठेवले आहे सांभाळायला. आम्ही दोघे नोकरी सांभाळून तिला नाही बघू शकत. माझी आई तिची खूप छान काळजी घेते. खूप आठवण येते तिची, तिच्यासाठी नेहमी छान छान कपडे, खेळणी घेऊन जाते. हे पंधरा दिवस म्हणजे मला पांढरा वर्षांसारखे वाटतात. लवकरच मी मुंबईला ट्रान्स्फर घेणार आहे, म्हणजे आम्ही एकत्र राहू शकू मुली बरोबर, आणि अजुन दोन वर्षांनी मला वर्क फ्रॉम होम ऑपशन पण मिळेल, मग काही चिंताच नाही."
"ओके, छान.... " मी मान डोलवत म्हणाले. तिची हकीगत ऐकल्यावर मला जरा सुन्न झल्यासारखे वाटले. मी काही आणखी खोलात नाही शिरले. मला तिचे खूप नवल वाटत होते, कौतुक वाटत होते. किती धाडसी, महत्वाकांक्षी स्त्री होती ती.पण मनातल्या एका कोपर्यात तिच्या जीवनाची कीव येत होती. आपला वेळ करियर् आणि कुटुंबात वाटून घेताना किती यातना होत असतील तिला. लग्न झालेय, मुलगी झालीय, पण तरीही त्याचा पूर्ण उपभोग ती घेऊ शकत नव्हती. किती संघर्ष होता तिच्या जीवनात, कोणाचा कसा, कोणाचा कसा?