Thursday, August 23, 2018

एक अनमोल राखी


रक्षाबंधन येते तेव्हा सर्व बहिणींना आस लागते भावाची. भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या कडे आपल्या रक्षणाचे वचन घेतात या बहिणी. बहीण भावाला एक आणणारा हा सण, श्री कृष्णाच्या कृपेने आपल्या देशात आनंदाने साजरा केला जातो. हा सण आला कि टीव्हीवर जाहिराती येतात, भाऊ कसा बहिणीला छान छान भेटवस्तू देतोय, तिचे लाड पुरवतोय, तिची काळजी घेतोय. 

राखी साजरी करायाला बहीण किव्वा भाऊच का हवा?मी एक स्त्री आहे,  देवाने मला स्वतःचा असा भाऊ दिला नाही, त्यामुळे मला कदाचित याचे महत्व कळणार नाही. 

देवाने मला भाऊ दिला नाही याची जाणीव मला दरवर्षी या सणाला होते. जेव्हा आपल्या भावासाठी राख्या विकत घ्यायला मैत्रिणी दिमाखाने दुकानात जातात,  मला खूप कुतूहल वाटते, इतके काय दडलेय त्या राखीत?..... भाऊ का हवा?.....  रक्षणाला? ..... कोणाच्या? ...... फक्त माझ्या?

रस्त्यावर हातात राखी बांधून फिरताना अनेक पुरुष दिसतात, बहिणीला रक्षणाचे वचन देऊन आल्यावर रस्त्यावरच्या प्रत्येक स्त्रीचे डोळ्याने वस्त्रहरण करणारे, असे भाऊ असतात का? बाकी, बलात्कार करणाऱ्यांना सुद्धा बहिणी असतीलच आणि त्यांनी पण हाताला कधी ना कधी राखी बांधली असेलच. मग मुलीवर अत्याचार करणारे ते हात रक्षणास समर्थ होते का? 

सासुरवाशीण बहिणीला राखी बांधून घरी परतल्यावर दारू पिऊन बायकोला, मुलांना बेधम मारणारे पुरुष म्हणजेच ते भाऊ का? बायकोकडून हुंडा मागणारे, तिचे शोषण करणारे, हेच का ते भाऊ आहेत?

आपल्याच आई वडिलांच्या घराचा, जमिनीचा, मालमत्तेचा वारसा घेऊन तो हक्काने देशोधडीला लावणारे सुद्धा भाऊ आहेतच की.

कंसाने, रावणाने  सुद्धा पाप कर्मात  त्यांच्या रक्षणासाठी आपल्या बहिणीचा वापर केला, राखी बांधून भावाच्या पापात हातभर लावणाऱ्या शूर्पणखा, पुतना आज सुद्धा सापडतील. पण आता त्यांचा वध करणारे श्रीराम, श्रीकृष्ण कुठे आहेत? कधी येतील? 

खरे तर स्त्री खुप सामर्थ्यवान आहे, तिला रक्षणाची गरजच नाही, ती क्षणोक्षणी काटकसर करणारी महालक्षमी  असते आणि  गप्प पुरुषाचा अहंकार व अत्याचार सहन करणारी महिषासुरमर्दिनी सुद्धा असते. वनवासाला गेलेली सीता, दुर्योधनाच्या अत्याचार सहन करणारी पाच पांडवांची पत्नी द्रौपदी ह्यांचे रक्षण करायला त्यांचे सक्खे भाऊ आले होते का?  नाही. हा विचार मला सुखावतो, मग वाटते कशाला हवा भाऊ? 

ज्यांना भाऊ आहेत त्यांच्यासाठी एक अनमोल राखी असेल, ती राखी म्हणजे फक्त आपल्या बहिणीच्या रक्षणाची  नव्हे,  तर सर्व स्त्रियांच्या, किव्वा सर्वांच्याच किव्वा समस्त देशाच्याच रक्षणाची जवाबदारी असेल. ती अनमोल राखी लवकरच बांधली गेली नाही तर श्रीविष्णूला लवकरच अश्या भावांचा वध करायला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. 



























No comments: