एका खेड्यात नुकतेच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले होते, रस्त्याच्या बाजूला
लागून एक खूप वृद्ध वडाचं झाड होतं, त्याच्या फांद्या, पारंब्या इतक्या मोठ्या होत्या कि वाटेत पडद्या सारख्या लोंबकळू लागल्या होत्या. रात्री तर त्या वाटेवर गाडी घेऊन लोक जात नसत कारण गाडी चालवणाऱ्या माणसांचे अपघात वाढू लागले होते. मागच्या महिन्यापासूनगावात त्या वडाच्या झाडाबद्दल गावात खूप चर्चा होती. लोकांचे म्हणणे होते की, ह्या वडाच्या झाडावर एक खूप वाईट भूत राहते, ते खूप विचित्र दिसते, रंगाने काळे-कुट्ट, केसांच्या जटा मोठाल्या, संपूर्ण चेहऱ्यावर पसरलेल्या, रात्री बारा नंतर दोन-चाकी गाडीवर जाणाऱ्या माणसांना अचानक ते भूत दिसायचे आणि ते पडून जखमी व्हायचे. पण भुताने आज पर्यंत कोणाला इज केली नव्हती. लोक घाबरून गेले होते, त्या वडाच्या झाडाजवळ सुद्धा जायला तयार नव्हते. गावाच्या सरपंचाने खूप उपाय केले, आधी पारंब्या कापल्या पण तरी अपघात काही कमी होईना, मग झाडाची फकीर, बाबा बोलावून पूजा, शांती वगैरे करून घेतली तरी काही फरक पडला नाही. लोकांना त्या भूताचे दर्शन व्हायचेच. लोकांनी त्या झाडाजवळ जायचे बंद केले, पारंब्या कापायला सुद्धा माणसं मिळत नव्हती, इतके ते झाड प्रसिद्ध झाले होते.
एका रात्री त्या गावच्या सरपंचाने आणि लोकांनी ठरवले आज या गोष्टीचा उलगडा करायचाच. जाळी, हत्यारे घेऊन एकदम जय्यत तयारी करून, काही लोकं बाराला त्या झाडाच्या आजू बाजूला लपून उभी राहिली. थोड्या वेळाने एक माणूस ठरवल्याप्रमाणे दोनचाकी गाडी घेऊन आला. ते भूत झपाट्याने खाली उतरले, आणि गाडी समोर जाऊ लागले, लोकांनी लगेच जाळी टाकून त्याला पकडले, आणि तिथेच बांधून ठेवले. सगळी माणसं त्याच्या भवती गोळा झाली आणि त्या भुताला जवळून पाहू लागली, तो खंडू नावाचा गावातलाच शाळकरी तरुण मुलगा निघाला, सगळे खूप रागावले होते त्याला पाहून त्याला मारू लागले. सरपंचाने सगळ्यांना शांत व्हायला सांगितले आणि त्याला विचारले, " काय रं पोरा, यो कशापाई केलं?आरं, तुझ्या बापाचाच मळा यो, यो झाड, तुझ्या बाबाने(आजोबाने) लाविलं व्हतं , कशा पाई सांग?"
खंडू रडतच सांगू लागला, " मला माफ करा!! मी चुकलो!!…. माया बाबानं (आजोबाने) यो वडाचं झाड लाविलं व्हतं, तो म्हातारा म्येला पन ह्यो झाड तो आपल्याला देऊन ग्येला, मागल्या महिन्यात एका सरकारी माणसाने बापाला पैसा चारला, त्याला ह्यो झाड कापायची परवानगी पायजे व्हति. यो झाड पुढल्या महिन्यात तोडायला हवं , इथं रस्ता रूंद करायचं सांगत व्हता माया बापाला, बापानी दम दिला व्हता कुनाला सांगितला तर मला आनि आईशीला मारून टाकेल, मला लाई ब्येकर वाटलं, मी ठरवलं झाडाच्या आस पास पन कुनाला वावरू द्येनार न्हाय. म्हनून मी यो असा वागलो, काळे कपडे आणि खोटे क्येस लावून लोकांना भीती घालाया लागलो, मला माफ करा!"