Monday, October 7, 2019

श्रीराम आणि ऋषी भारद्वाज अग्निहोत्र संवाद

राम आणि सीता वनवासात होते तेव्हा,  चित्रकूट ला जायच्या आधी त्यांना तिथे पोहोचण्याचा मार्ग अग्निहोत्र करणाऱ्या भारद्वाज ऋषींनी दिला होता, त्यासाठी त्यांनी अग्निहोत्र करणाऱ्या भारद्वाज ऋषींची भेट घेतली होती, तेव्हा रामांनी त्यांच्याशी हे संभाषण केले,
"प्रणाम गुरु, मी अयोध्याच्या राजा दशरथाचा पुत्र, राम. " असे म्हणून रामांनी अग्निहोत्र ऋषींना वंदन केले. 
"यशस्वी भवः " असा आशीर्वाद त्यांना भारद्वाज ऋषींनी दिला. 

त्या नंतर त्यांनी लक्ष्मणाकडे हात करून लक्ष्मणांचीही ओळख करून दिली, "हा माझा भाऊ, लक्ष्मण. " लक्ष्मणाने काहीही ना बोलता लगेच त्यांना प्रणाम केला. 
"यशस्वी भवः " पुन्हा एकदा अग्निहोत्र करताना भारद्वाज ऋषींनी लक्ष्मणाला आशीर्वाद दिला. 

परंतु जेव्हा सीतेची ओळख केली तेव्हा त्यांचे शब्द खूप मौल्यवान होते,  "हि विदेही राजा जनक ची पुत्री आणि माझी कल्याणमयी भार्या, सीता. " 

ह्यातून काय अर्थ घेऊ शकतो आपण, सर्वप्रथम ते म्हणतात, 

"हि विदेही राजा जनक ची पुत्री "- श्रीराम सीतेचे स्वामी होते, तिचे पती होते, जन्मोजन्मीचे नाते होते त्यांचे,  त्यांचा तिच्याशी स्वकर्तृत्वावर विवाह झाला होता, तरीही तिची ओळख करून देताना त्यांनी, सर्वप्रथम तिच्या वडिलांचे मानाने नाव घेतले. त्यामुळे त्यांच्या  नम्रतेचा आपण बोध घेऊ शकतो. 

त्यानंतर ते म्हणतात, 
"माझी कल्याणमयी भार्या" - याचा अर्थ असा की, हि नुसती माझी भार्या म्हणजेच पत्नी नसून माझे कल्याण करण्याच्या हेतूनेच , सीतेने माझ्या आयुष्यात पदार्पण केले आहे, त्यामुळे माझी पत्नी नव्हे तर कल्याणमयी भार्या अशी ओळख त्यांनी करून दिली. श्रीरामांच्या या विश्वासाला सीता पात्र तर होतीच, परंतु त्यांचे हे शब्द सीतेला सुचवून देत की, माझ्या मुळेच माझ्या स्वामी श्रीरामांचे कल्याण होणे आहे. 
ह्यातून त्यांच्या विनम्रतेचा बोध होतो. 


भारद्वाज ऋषींनी रामांना राजा दशरथाच्या निर्णयाबद्दल विचारले असता राम सहजपणे म्हणाले की, "पिताश्री राजा दशरथाच्या या निर्णयाने खरे तर त्यांनी माझ्यावर उपकारच केलेत, त्यामुळे आज मला आणि सीतेला, तुमच्यासारख्या ऋषीमुनींनी भेट घेऊन ज्ञान, परमज्ञान प्राप्त होतेय. " 

त्यांचे हे शब्द खूप महत्वाचे आहेत, त्यातून हा बोध होतोय,
"मला आणि सीतेला ज्ञान प्राप्त होतेय"- आता ते एकटे नसून सीता, त्यांची पत्नी त्यांची अर्धांगिनी आहे आणि आपल्या  बरोबरीने आपली पत्नी आपली शुभचिंतक, आपली मैत्रीण ज्ञान मिळवेल ही  भावना दिसून येते.

त्यामुळे बोध असा कि पती पत्नी मध्ये कुठलेही अंतर नसावे. एक मेकांच्या कल्याणाचा दृष्टीकोन असेल तर त्यातून नक्कीच चांगली प्रजा, व त्या नवीन प्रजेला उत्तम संस्कार होऊ शकतात. 


No comments: