Tuesday, April 17, 2018

सोवळे प्रतिष्ठेचे

स्वछतेची व हायजिनची आवड असावी, पण त्याचा अतिरेक करू नये.

एकदा एका मैत्रिणीकडून ऐकले, ती व तीची आजी एका नातेवाईकाकडे नवजात बाळाला बघायला गेले होते, तर कळले घरात एक बाई ठेवली आहे खास डेटॉल ने घर पुसायला. कोणीही पाहुणे बाळाला बघून गेल्यावर ती  घराची फर्शी व बाळाची खोली डेटॉल ने पुसून काढते. एवढेच काय तर, बाळाला उचलण्या आधी पाहुण्यांना ताकीद दिली जाते कि हात डेटॉल ने धुवून यावे व मग बाळाच्या बाजूला ठेवलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा. हा प्रकार आजीला पचला नाही. आजीने गम्मत म्हणून सल्ला सुद्धा दिला कि " अगं सॅनिटायझर सोड, त्या पेक्षा आयुर्वेदिक गोमूत्र वापर. ते सुद्धा शुद्धीकरण करते. बाळाच्या खोलीत कोपऱ्यात शिंपडले कि काम झाले." ह्यावर ते घरातले खूप नाराज झाले, त्यांचे तिखट कटाक्ष सांगत होते 'गोमूत्राचे सायन्टिफिक नाव तरी माहित आहे का तुम्हाला? आमच्या बाळाची काळजी कशी घ्यावी हा आमचा प्रश्न आहे.' बाळाला क्लीनन्सिंग वाईप्स वापरताना पाहून आजीला प्रश्न पडला "हे काय आहे? ओले रुमाल वाटतायत, कशात तरी डुबवलेत वाटते" आजीने कुतूहलाने एक वाईप पाकिटातून काढला "काय घाण वास आहे!! " त्या वाईप चा वास घेत आजी म्हणाली. घरातल्यांना खूप संताप आला होता आजीचा.

जर तुम्हाला कोणी म्हणाले " त्या घरापासून सावध राहा बरं  का?"  तर तुम्हाला वाटेल त्या घरात कुत्रा आहे कि काय पाळलेला ज्याला लोक इतके घाबरत आहेत. नंतर कळेल, त्या घरात  स्वच्छतेचे  खूप वेड आहे. घरातला एकूण एक चमचा सुद्धा इतका स्वच्छ. कुठेही धुळीचा एक कण नाही सापडणार, नुसते काचे सारखे स्वच्छ घर. कल्पना करा घराच्या प्रवेशाला तीन पायऱ्या आहेत, त्यात पहिल्या पायरीला साबण लावलाय, त्या वरून अनेक पाहुणे पडलेत. दुसऱ्या पायरीला ब्रश आहे, व तिसऱ्या पायरीला नळ लावलेला आहे. येणारा प्रत्येक पाहुणा पाय धुवूनच प्रवेश करेल या साठी हे  प्रयोजन. हद्द म्हणजे घरात तर स्वच्छता आहेच पण घराच्या आजू बाजूला सुद्धा कुत्रा मांजर फिरकले  नाही पाहिजे, "कुत्र्याला/मांजराला जर खायला घालायचे असेल तर घरापासून अर्धा किलोमीटर लांब जाऊन खाऊ घालावे." अशी पाटी सुद्धा लावली आहे आपल्या दाराला. पाण्याचा वापर अतिशय केला जातोय. सकाळ संध्याकाळ घराचा ओटा धु धु धुतला जातोय. खोटे नाही सांगत. असे घर मी पाहिले आहे.  

कुठे घरातल्या लहानग्यांना सुद्धा खूप बंधने आहेत. ते सहसा बाहेर खेळायला जात नाहीत, गेले तरी त्यांना सूचना खूप असतात " कोणा  मुलाच्या नाकातून शेंबुड  दिसला तर त्याच्यापासून लांब रहा, माती लागलेले बोट नाकात घालू नकोस",  मुलांना धूळ नको लागायला म्हणून आई वडील किती झटतायत. त्यांना बागेत नेऊन म्हणतात "मातीत नको खेळू रे मेल्या." पावसाळ्यात पाणी साचलेले असेल तर म्हणतात, " पाण्यातून चालू नका रे पोरांनो." का? तर आपली घरे स्वच्छ ठेवायला. 
 एक कुटुंब आहे ओळखीत,  त्यांच्या मुलांना शौचालय खुप पांढरे लागते, नाही तर ते वापरत नाहीत. ते आपल्या मुलांसाठी शाळा शोधताना आधी शाळेच्या शौचालयाची तपासणी करतात. त्यांच्या लेखी शौचालय कसे दूधासारखे  पांढरे शुभ्र असायला हवे. एक पिवळा डाग नाही. कुठेही जायच्या आधी ते विचारतात " शौचालयाची स्टाईल काय आहे? व्हेस्टन असेल आणि  दूधा सारखे पांढरे असेल तरच आमची मुलं अड्जस्ट होतात. शौचालयात एअर फ्रेशनर आहे का? शौचालयाला एक्झास्ट फॅन आहे का?  त्यात सॅनिटायझर आहे का? "  

वॉटर प्युरिफायर चे नाव तर ऐकलेच आहे. एका घरात पाणी आधी उकळवून मग ते प्युरिफायर मधून काढले जाते याला अति निर्जंतुकीकरण म्हणायचे.  आता एक नवीन यंत्र सुद्धा आलय "एयर प्युरिफायर", हवेचे शुद्धीकरण करते. किती लोकांनी आपल्या घरात ते बसवून घेतले. हीच लोक घराबाहेर गाड्यांमधून धूर काढत हवेला अशुद्ध करतात. 
अति स्वच्छ राहणे हा एक मानसिक रोग तर नाही झालाय?  किव्वा आधीच स्वच्छता ठेवली तर सारखे साफ करावे लागणार नाही, याचा अर्थ काम कमी होईल. याचा अर्थ अति स्वच्छता ठेवणारे आळशी असतात असे तर नाही ना? 
पारंपारिक सोवळ्याला नावे ठेवणारे अनेक लोक सापडले पण ह्या सोवळ्याचे काय? हे हि तर सोवळेच आहे फक्त ह्याला सोयीस्कर रित्या सुंदर शब्दात "हायजिन" म्हणून ह्याचे रूपांतर केले जातेय. हे सोवळे पाळणे म्हणजे आज काल एक प्रतिष्ठेचे लक्षण आहे असे नाही का वाटत तुम्हाला? 


No comments: