Tuesday, April 17, 2018

सोवळे प्रतिष्ठेचे

स्वछतेची व हायजिनची आवड असावी, पण त्याचा अतिरेक करू नये.

एकदा एका मैत्रिणीकडून ऐकले, ती व तीची आजी एका नातेवाईकाकडे नवजात बाळाला बघायला गेले होते, तर कळले घरात एक बाई ठेवली आहे खास डेटॉल ने घर पुसायला. कोणीही पाहुणे बाळाला बघून गेल्यावर ती  घराची फर्शी व बाळाची खोली डेटॉल ने पुसून काढते. एवढेच काय तर, बाळाला उचलण्या आधी पाहुण्यांना ताकीद दिली जाते कि हात डेटॉल ने धुवून यावे व मग बाळाच्या बाजूला ठेवलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा. हा प्रकार आजीला पचला नाही. आजीने गम्मत म्हणून सल्ला सुद्धा दिला कि " अगं सॅनिटायझर सोड, त्या पेक्षा आयुर्वेदिक गोमूत्र वापर. ते सुद्धा शुद्धीकरण करते. बाळाच्या खोलीत कोपऱ्यात शिंपडले कि काम झाले." ह्यावर ते घरातले खूप नाराज झाले, त्यांचे तिखट कटाक्ष सांगत होते 'गोमूत्राचे सायन्टिफिक नाव तरी माहित आहे का तुम्हाला? आमच्या बाळाची काळजी कशी घ्यावी हा आमचा प्रश्न आहे.' बाळाला क्लीनन्सिंग वाईप्स वापरताना पाहून आजीला प्रश्न पडला "हे काय आहे? ओले रुमाल वाटतायत, कशात तरी डुबवलेत वाटते" आजीने कुतूहलाने एक वाईप पाकिटातून काढला "काय घाण वास आहे!! " त्या वाईप चा वास घेत आजी म्हणाली. घरातल्यांना खूप संताप आला होता आजीचा.

जर तुम्हाला कोणी म्हणाले " त्या घरापासून सावध राहा बरं  का?"  तर तुम्हाला वाटेल त्या घरात कुत्रा आहे कि काय पाळलेला ज्याला लोक इतके घाबरत आहेत. नंतर कळेल, त्या घरात  स्वच्छतेचे  खूप वेड आहे. घरातला एकूण एक चमचा सुद्धा इतका स्वच्छ. कुठेही धुळीचा एक कण नाही सापडणार, नुसते काचे सारखे स्वच्छ घर. कल्पना करा घराच्या प्रवेशाला तीन पायऱ्या आहेत, त्यात पहिल्या पायरीला साबण लावलाय, त्या वरून अनेक पाहुणे पडलेत. दुसऱ्या पायरीला ब्रश आहे, व तिसऱ्या पायरीला नळ लावलेला आहे. येणारा प्रत्येक पाहुणा पाय धुवूनच प्रवेश करेल या साठी हे  प्रयोजन. हद्द म्हणजे घरात तर स्वच्छता आहेच पण घराच्या आजू बाजूला सुद्धा कुत्रा मांजर फिरकले  नाही पाहिजे, "कुत्र्याला/मांजराला जर खायला घालायचे असेल तर घरापासून अर्धा किलोमीटर लांब जाऊन खाऊ घालावे." अशी पाटी सुद्धा लावली आहे आपल्या दाराला. पाण्याचा वापर अतिशय केला जातोय. सकाळ संध्याकाळ घराचा ओटा धु धु धुतला जातोय. खोटे नाही सांगत. असे घर मी पाहिले आहे.  

कुठे घरातल्या लहानग्यांना सुद्धा खूप बंधने आहेत. ते सहसा बाहेर खेळायला जात नाहीत, गेले तरी त्यांना सूचना खूप असतात " कोणा  मुलाच्या नाकातून शेंबुड  दिसला तर त्याच्यापासून लांब रहा, माती लागलेले बोट नाकात घालू नकोस",  मुलांना धूळ नको लागायला म्हणून आई वडील किती झटतायत. त्यांना बागेत नेऊन म्हणतात "मातीत नको खेळू रे मेल्या." पावसाळ्यात पाणी साचलेले असेल तर म्हणतात, " पाण्यातून चालू नका रे पोरांनो." का? तर आपली घरे स्वच्छ ठेवायला. 
 एक कुटुंब आहे ओळखीत,  त्यांच्या मुलांना शौचालय खुप पांढरे लागते, नाही तर ते वापरत नाहीत. ते आपल्या मुलांसाठी शाळा शोधताना आधी शाळेच्या शौचालयाची तपासणी करतात. त्यांच्या लेखी शौचालय कसे दूधासारखे  पांढरे शुभ्र असायला हवे. एक पिवळा डाग नाही. कुठेही जायच्या आधी ते विचारतात " शौचालयाची स्टाईल काय आहे? व्हेस्टन असेल आणि  दूधा सारखे पांढरे असेल तरच आमची मुलं अड्जस्ट होतात. शौचालयात एअर फ्रेशनर आहे का? शौचालयाला एक्झास्ट फॅन आहे का?  त्यात सॅनिटायझर आहे का? "  

वॉटर प्युरिफायर चे नाव तर ऐकलेच आहे. एका घरात पाणी आधी उकळवून मग ते प्युरिफायर मधून काढले जाते याला अति निर्जंतुकीकरण म्हणायचे.  आता एक नवीन यंत्र सुद्धा आलय "एयर प्युरिफायर", हवेचे शुद्धीकरण करते. किती लोकांनी आपल्या घरात ते बसवून घेतले. हीच लोक घराबाहेर गाड्यांमधून धूर काढत हवेला अशुद्ध करतात. 
अति स्वच्छ राहणे हा एक मानसिक रोग तर नाही झालाय?  किव्वा आधीच स्वच्छता ठेवली तर सारखे साफ करावे लागणार नाही, याचा अर्थ काम कमी होईल. याचा अर्थ अति स्वच्छता ठेवणारे आळशी असतात असे तर नाही ना? 
पारंपारिक सोवळ्याला नावे ठेवणारे अनेक लोक सापडले पण ह्या सोवळ्याचे काय? हे हि तर सोवळेच आहे फक्त ह्याला सोयीस्कर रित्या सुंदर शब्दात "हायजिन" म्हणून ह्याचे रूपांतर केले जातेय. हे सोवळे पाळणे म्हणजे आज काल एक प्रतिष्ठेचे लक्षण आहे असे नाही का वाटत तुम्हाला? 


Thursday, April 12, 2018

चिरतरुण

वाड्याचे काय करावे? साऱ्या गावाला प्रश्न पडला होता. वाडा ग्रामपंचायतीच्या नावावर दान करून गेलेले अप्पासाहेब आयुष्यभर खस्ता खाऊन जगले. त्यांना मूळ बाळ नव्हते, पन्नाशीला वार्धक्य आले होते.

पण मधला काळ ते खूप सुंदर जगले. आपल्या पत्नी साठी किव्वा मुलं नसल्या मुळे झुरत नव्हे तर कसे?

आपल्याला मुलं नाहीत म्हणून त्यांनी अनेक वृक्षांना आपल्या वाड्याच्या अवती भवती लावून त्यांचे मुलांसारखे संगोपन केले. वडिलोपार्जित शेती मध्ये स्वतःला गुंतवले व शेती मध्ये गावातल्याच गरजू गरीब लोकांना कामं दिलीच पण पिकाचे सारे उत्पन्नही ते त्यांनाच वाटून देत. रोज सकाळी नियमित व्यायाम

वाड्यातच ग्रामपंचायतीची मिटिंग बसवली गेली. मिटिंग मध्ये अनेक, विचार समोर आले, कोणी म्हणे वाड्यात शाळा सुरु करूया, व्यायाम शाळा करूया, कोणी म्हणे वाड्याचे मंगल कार्यालय बनवूया तर कोणी म्हणे सुंदर ग्रामपंचायत कार्यालय बनवूया.

"एक मिनिट !! थांबवा हि चर्चा! " अप्पासाहेबांचे वकील दारात उभे होते, ते म्हणाले, " मी तुम्हाला काही द्यायला आलोय. अप्पासाहेब गेले, पण या वाड्याचे काय करावे हे तुम्ही परस्पर ठरवू शकत नाहीत. त्यांनी आपल्या ग्रामपंचायीतला वाडा  दान केलेला आहे पण त्यांनी लिहिलेले हे पत्र आधी वाचा! त्यांनी गेल्यावर्षीच हि विल बनवली माझ्याकडे. हि बघा त्यांची सही." सरपंचाला पत्र दाखवत वकील साहेब सुद्धा चर्चेत बसले.

सरपंच साहेबांनी पत्र वाचायला सुरुवात केली.

सर्वांना नमस्कार,

मी आज तुमच्यात नसलो तरी, मला तुम्ही नेहमी जिवंत ठेवाल हि खात्री आहे.
ह्या वाड्याला कोणीही वारसदार नाहि. मला लोकांनी अनेक सल्ले दिले, ह्या वाड्याला विकून टाक, ह्याला भाड्यावर देऊन काही व्यवसाय चालू कर, इथे एक सुंदर हॉटेल काढ.

पण मला हे काहीही नको होते, माझी नेहमी एकच इचछा होती कि गावातील तमाम वृद्धांना काही काम मिळावे.
वृद्ध नव्हे तर चिरतरुण म्हणावे, त्यांना वृद्ध बनवतात त्यांचे विचार, त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहावे हीच माझी इचछा . या वाड्याचे तुम्ही एक छान आलय करा. त्यात फक्त वृद्धांना प्रवेश असेल. मी लावलेल्या वृक्षांची काळजी  घेणे, वाडा  स्वचछ  ठेवणे, तसेच वाड्यात एक लायब्ररी बनवा. दर महिन्याला  वाढदिवस साजरे करा. मी वापरलेले सर्व व्यायाम यंत्र वापरून त्यांने तंदुरुस्त राहावे. गावातल्या वृद्ध स्त्रियांनी सुद्धा ह्यात शामिल व्हावे, घर सोडून इथे येऊन आपला वेळ घालवावा. घरात बसून तुम्हाला काहीही मिळणार नाही, स्वयंपाक, घर काम सोडून तुम्ही इथे या. तरुण पिढीला जगू द्या तुम्हीही जगा. एक मेकांना आधार द्या.
इथेही एक स्वयंपाकघर आहे, त्याचा वापर करा. तुम्हाला पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटेल. नक्की करून पहा.

माझी हि छोटीशी इचछा देव नक्की पुरी करेल हि खात्री आहे. ह्या वाड्याला नाव द्या "चिरतरुण"

धन्यवाद,
तुमचा अप्पासाहेब

सर्वांचे मन सुन्न झाले होते. आपण हा विचार का नाही करू शकलो? आपल्या गावाला असा एक चिरतरुण मिळाला याचा सर्वांना अभिमान वाटत होता. आपल्या दुःखातून सुद्धा जो दुसऱ्यांना सुख देईल असा चिरतरुण. उन्हाच्या तीव्र लाटांमध्ये लोळून आपल्याला सावली देणारा चिरतरुण.

पुढच्या दोन आठवड्यात वाड्यात खूप गोष्टी घडू लागल्या होत्या, अनेक वृद्ध तिथे येऊन आपला वेळ घालवू लागले. कोणी पुस्तके वाचत असे, कोणी व्यायामात, तर कोणी स्वयंपाकघरात व्यस्त, कोणी वृक्षांना पाणी घाली कोणी खत, कोणी गरम गरम चहा बनवून एक मेकांना पिऊ घाली. महिन्यातून एकदा वाढदिवस व जय्यत पार्टी असे. तिथे येऊन ते आपले सारे दुःख विसरी.

आनंदाच्या झोतात चिरतरुण गाजत होता.